मुंबई - देशभरात जरी विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींचे अनेक पुरस्कार, सन्मान देऊन कौतुक झाल्याचेच चित्र आतापर्यंत पाहायला मिळत होते. मात्र, प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. ‘टाईम’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींना स्थान देण्यात आले असले तरी यात पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘भारताला तोडणारा प्रमुख’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे शेवटचे दोन टप्पे शिल्लक राहिले असताना 'टाइम'ने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. लेखक आणि पत्रकार आतीश तासीर यांनी हा लेख लिहिला आहे. महिलांच्या मुद्यांवर मोदींची कामगिरी, नोटाबंदीचा निर्णय, लोकसभेसाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी या पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातील मुद्यांचा लेखात उल्लेख करण्यात आला आहे. या लेखासोबतच पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सुधारणांचा आढावा घेणारा इयन ब्रेमर यांचाही लेख प्रसिद्ध झाला आहे. 'मोदी हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे आशास्थान' असल्याचे नमूद करताना मोदींच्या कार्यकाळातील संमिश्र आर्थिक कामगिरीवर ब्रेमर यांनी भाष्य केले आहे. भारताला आणखी सुधारणांची आवश्यकता असून त्यासाठी मोदी यांचाच पर्याय सर्वोत्तम असल्याचे ब्रेमर यांनी म्हटले आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करताना आधार, स्वच्छ भारत आणि उज्ज्वला योजना आदींचा विस्तार केल्याबद्दल मोदींची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापुढे विरोधी पक्ष अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची लोकसभा निवडणुकीत सहज आगेकूच सुरू आहे. कमकुवत विरोधी पक्षांमुळे मोदी नशीबवान ठरले आहेत, असेही 'टाइम'ने म्हटले आहे.