एसटी महामंडळाचा आगाऊ पणा, तिकिटासाठी आधारकार्डच हवे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2019

एसटी महामंडळाचा आगाऊ पणा, तिकिटासाठी आधारकार्डच हवे


मुंबई - सुट्टीच्या हंगाम असल्याने मुंबईतून राज्यात विशेषत: कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांनी भरून जात आहेत. गर्दीतून उभे राहून प्रवास टाळण्यासाठी प्रवाशांकडून एसटीचे आगाऊ आरक्षण करण्यात येते. मात्र आरक्षित तिकिटांसाठी मतदान ओळखपत्र ग्राह्य नसल्याचा धक्कादायक प्रकार एसटीमध्ये उघडकीस आला आहे. यामुळे आरक्षित तिकीट असून देखील पुन्हा पैसे देऊन तिकीट काढून प्रवास करण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढवली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही योजनेसाठी आधारची सक्ती करता येणार नाही असे स्पष्ट केले असतानाही महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ मात्र आधारकार्डची सक्ती करत असल्याने एसटी महामंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात असल्याने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

काय आहे नेमके प्रकरण -
नवी मुंबई येथे राहणाऱ्या प्रतीक्षा होडे या तरुणीने चंद्रा होडे (आई), १४ वर्षांची बहीण आणि ४ वर्षाची चिमुकली यांचे मुंबई सेंट्रल ते कोंडगाव (मंडणगड, जि.रायगड) या बसचे तिकीट महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आरक्षित केले. कोकणात जाणाऱ्या बहुतांशी बस 'हाऊसफुल्ल' असल्याने मंगळवारी रात्री उशिरा मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या एसटीचे तिकीटच उपलब्ध होते. गावी जाणे गरजेचे असल्यामुळे आई आणि बहिणीच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण करण्यात आली. मंगळवारी रात्री कामोठे येथून आईने बहिणीसह एसटीमध्ये प्रवेश केला. काही किलोमीटर गाडी पुढे गेल्यानंतर वाहकाने तिकिटाची मागणी केली. आईने आरक्षित तिकिटांची प्रिंट आणि ओळखपत्र म्हणून मतदान ओळखपत्र दाखवले. मात्र एसटीतील वाहकाने 'मतदान ओळखपत्र जूने असून आरक्षित तिकिटांसाठी केवळ आधारकार्ड हेच ओळखपत्र आवश्यक' असल्याचे सांगत पुन्हा तिकीट काढण्यास सांगितले. आधारकार्ड सोबत नसल्यामुळे आईने राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकदेखील वाहकाला दाखवले. मात्र आधारकार्डच आवश्यक असल्याचे सांगत वाहकाने, 'तिकिट काढा, नाही तर मी एसटी थांबवतो तुम्ही येथेच उतरा' अशा सूचना केल्या. रात्री-अपरात्री महामार्गावर कुठेही उतरल्यास धोक्याची स्थिती निर्माण होण्याची भीती वाटल्यामुळे आरक्षित तिकीट असूनदेखील आईने पुन्हा एकदा तिकीट काढले आणि प्रवास केला, अशी हकीकत प्रतीक्षा यांनी सांगितली.

एसटी महामंडळाचा बोलण्यास नकार -
मतदान ओळखपत्र ग्राह्य नसल्यास आरक्षण करतानाच एसटी महामंडळाने ओळखपत्रांची यादी प्रसिद्ध करावी, जेणेकरून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी प्रतीक्षाने केली आहे. या प्रकारावर एसटी महामंडळाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला.

परताव्याची प्रतीक्षाच -
वाहकाच्या आडमुठेपणामुळे पुन्हा पैसे देऊन तिकीट काढावे लागले. आरक्षित तिकीट रद्द करून पैसे मिळवण्यासाठी खेटे घालावे लागत आहेत. मुळात वाहकांच्या चुकीचा भुर्दंड सामान्य प्रवाशांनी का सहन करावा?, असा संतप्त सवाल प्रतीक्षाने उपस्थित केला. यापुढे आयुष्यात कधीच एसटीने प्रवास करणार नसल्याची उद्विग्न प्रतिक्रियाही प्रतीक्षाने यावेळी दिली.

एसटीचे ट्विटर अकाऊंट निष्क्रिय -
प्रतिक्षाने हा सगळा प्रकार ट्विटरवर व्यक्त केला आणि एसटी महामंडळाला टॅगदेखील केले. मात्र एसटीचे ट्विटर अकाऊंट निष्क्रिय असल्याने त्यावर कोणताही प्रतिसाद महामंडळाकडून मिळाला नाही. आरक्षित तिकिटाच्या परताव्यासाठी एसटीच्या १८००-२२१२५० या टोलफ्री क्रमांकावर तक्रार केली असता 'तुम्ही आगारात जाऊन कॉल करा', अशी माहिती देण्यात आली.

Post Bottom Ad