मुंबई - राज्यात गाढवांची संख्या घटत चालली असून त्यांच्या संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करावी असे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
एकेकाळी ओझी लादून नेण्यासाठी उपयुक्त ठरणारी, आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे, गावातील विविध व्यावसायिकांकडे हमखास आढळणारी गाढव प्रजाती आणखी काही वर्षांतच नामशेष होईल असा गंभीर इशारा राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. २००७ मध्ये राज्यात सुमारे ३२ हजार गाढवे होती. गाढवांच्या संख्येत २०१२ मध्ये नऊ टक्क्यांची घट झाली असून राज्यात फक्त २९ हजार १३५ गाढवे उरली आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त प्रशांत भाड यांनी सांगितले की आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या एसपीसीएला (सोसायटी फॉर प्रोटेक्शन फ्रॉम क्रुएल्टी अगेन्स्ट अनिमल्स) याबाबत पावले उचलायला सांगितले आहे. जिल्ह्यात कुठेही गाढवांची अवैध कत्तल होत असेल तर पोलिसांनी सतर्क राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गाढवांची संख्या कमी होण्याची कारणे -
गाढवांचे मालक त्यांचा सांभाळ नीट करत नाहीत. गाढववांना अनेकदा इतके राबवून घेतले जाते की शारीरिक कमजोरीमुळे त्यांचा लवकरच मृत्यू होतो. गायी बैल, बकऱ्या यांच्याइतके प्रेम गाढवांच्या वाट्याला येत नाही. त्याखेरीज त्यांच्या हाडांचा उपयोग काही औषधांमध्ये केला जातो, त्यासाठीही काही वेळेला त्यांची अवैध कत्तल होण्याची प्रकरणे घडलेली आहेत.