मुंबई - गडचिरोली मधील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १६ जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा देशभरातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर केलेल्या ट्विट म्हटले की, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मी सलाम करतो. शहीद झालेल्या जवानांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाव देणार नाही. जवानांवर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही असे म्हटले आहे. मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
मुख्यमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-६० पथकाचे १६ जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डीजीपी आणि गडचिरोली एसपींच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. गडचिरोलीतील हल्ला हा भ्याड असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सांत्वना व्यक्त करतो असेही सिंह यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे - आठवले ....
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यायला हवे. दलित आदिवासी यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर नक्षलवाद्यांनी हिंसक मार्ग सोडला पाहिजे. हिंसक कारवाया करून कोणाचे ही भले होणार नाही. नक्षलवाद्यांनी शांतता आणि लोकशाही मार्ग स्वीकारून देशाच्या मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे.