मुंबई - पावसाळापूर्व नालेसफाईची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. पश्चिम उपनगरातून आतापर्यंत ४० टक्के गाळ काढून वाहून नेण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला. सफाई कामांत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांची हयगय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी दिले. महापौरांच्या उपस्थितीत पश्चिम उपनगरातील नाल्यांची बुधवारी पाहणी करण्यात आली. याप्रंसगी सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रशेखर वायंगणकर, संबंधित प्रभागातील नगरसेवक, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून मुंबईचे जनजीवन विस्कळीत होते. मोठ्या मनस्थापाला मुंबईकरांना सामोरे जावे लागते. नालेसफाईवरून आरोप-प्रत्यारोप होतात. तरीही नालेसफाई कामांची दरवर्षी बोंब असते. यंदाही महापौरांच्या समोरच नालेसफाईच्या कामाचे धिंडवडे उडाल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम उपनगरातील सफाईकामे पावसाळ्यापूर्वी ४० टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्षात नाल्यांची स्थिती वाईट आहे. नाल्यात कचऱ्याचा ढिग दिसून येतो. नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला भूमाफियांनी भरणी टाकून अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे झाल्याचे आढळून आले. नाल्याच्या भिंतीवरच घरे उभी राहिली आहेत. येथून रहिवाशी थेट कचरा नाल्यात टाकत असल्याचे दृष्य दिसून आले. वांद्रे येथील भारतनगर, वाकोला, खारमधील गजदरबंध पंपिंग स्टेशनला लागून असलेला मेन एव्हन्यू नाल्याच्या पात्रात नुकत्याच पोकलेन मशीन उतरविण्यात आल्याचे दिसून आले. मिठी नदी, भारत नगर नाला, वाकोला, गजधर बांध, मेन अव्हेन्यू नाला, पवनहंस नाला, इर्ला नाला, मजास नाला, विलेपार्लेतील श्रध्दानंद नाल्याची महापौरांनी पाहणी केली. १ एप्रिलपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. ५ लाख ४५ हजार मेट्रिक टन गाळाचे उद्दिष्ट आहे. परंतु, पश्चिम उपनगरातील नदी नाल्यातून ३९ टक्के गाळ काढला आहे. म्हणजेच २ मे पर्यंत २ लाख ७० हजार मेट्रिक टन गाळ काढून वाहून नेण्यात आल्याची माहिती, पर्जन्य जलवाहिन्याचे मुख्य अभियंता श्रीकांत कावळे यांनी महापौरांना यावेळी दिली. तसेच नदी नाल्यांतून काढलेला गाळ वसई, भिवंडी, उरण, पनवेल-तळोजा आदी ठिकाणी ठेकेदारांमार्फत नेऊन टाकण्यात येत असल्याचे सांगितले. दरम्यान, नालेसफाईची कामांत कुचराई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नालेसफाईबाबत समाधानी असल्याचे ते म्हणाले.
खणकर संतापले
मिठी नदीची सफाई आणि मागील वर्षात सफाई कामांत झालेल्या भ्रष्टाचार आणि कारवाई संदर्भात पत्रकारांनी महापौरांना छेडले असता, पश्चिम उपनगरातील पर्जन्य वाहिन्या विभागाचे उपअधिकारी विद्याधर खणकर संतप्त झाले. अखेर महापौरांनीच त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.