गडचिरोली - महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला. या स्फोटात १६ जवान शहिद झाले. महाराष्ट्र दिनी स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. नक्षलवाद्यांनी केलेला स्फोट आणि जाळपोळीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गडचिरोलीमधील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर हा स्फोट घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने शीघ्र कृती दलाच्या जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी केलेल्या या स्फोटामध्ये क्यूआरटी म्हणजेच क्विक रिस्पॉन्स टीमचे 16 जवान हुतात्मा झाल्याचे समजते.
सदर हल्ल्यात एका खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभूळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामध्ये वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पहाटे कुरखेडा येथे वाहनांची जाळपोळ झाल्यानंतर घटनास्थळाला भेट देण्यासाठी एसडीपीओ शैलेश काळे गेले असता त्यांनी तेथून या पथकाला तातडीने तिकडे बोलावले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले असताना हा हल्ला करण्यात आला आहे.