मुंबई - येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएड पदवी अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा होणार आहे. तर, एमएड अभ्यासक्रम पदवीनंतर तीन वर्षांचा असेल. बीएड अभ्यासक्रमाला आता बारावीनंतर प्रवेश दिला जाईल. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून या अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याविषयी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. पदवीनंतरचा बीएड अभ्यासक्रम आता 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' होणार आहे. या नवीन पद्धतीनुसार विद्यार्थी बारावीनंतर थेट बीए बीएड किंवा बीएससी बीएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. यामध्ये विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासोबतच अध्यापनाचे कौशल्येही शिकविली जातील. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेकडून याबाबतची नियमावली आणि अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून, सध्याच्या बीएड कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. तसेच काही विद्यापीठांमध्ये नियमित कॉलेज आणि बीएड कॉलेज यांनी एकात्मिक अभ्यासक्रम तयार केल्यास पहिले दोन वर्षे नियमित कॉलेज व नंतरची दोन वर्षे बीएड कॉलेज असे शिक्षण घेण्याची मुभाही आहे. दरम्यान, पाच वर्षांत यामध्ये तीन वेळा बदल झाला आहे. सन २०१४पर्यंत हा अभ्यासक्रम एक वर्षाचा होता. तो सन २०१५-१६मध्ये दोन वर्षांचा करण्यात आला होता.
अध्यापक पदवी कॉलेजांची स्थिती
बीएड कॉलेज…. : ५१०
एकूण जागा…… : ३८,७७५
झालेले प्रवेश…… : २७,२०२
रिक्त जागा. …… : ११,५७३