भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास कलम ३७० रद्द करणार - शहा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2019

भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास कलम ३७० रद्द करणार - शहा


शिमला - जर नरेंद्र मोदी यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड झाली तर काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द केले जाईल, असे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी हिमाचल प्रदेशमधील एका सभेला संबोधित करताना दिले. विशेष म्हणजे काश्मीरमधील वादग्रस्त कलम ३७० वरून अगोदरच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत..

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यासाठी वेगळ्या पंतप्रधानाची मागणी केली आहे. तर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात काश्मीरमधील अफस्पा कायद्याची समीक्षा करत देशद्रोहाच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचे वचन दिले आहे. यातून त्यांची विचारसरणी दिसून येते; पण जर भाजप पुन्हा सत्तेत आली आणि मोदी पंतप्रधान बनले तर कलम ३७० निश्चितरीत्या रद्द केले जाईल, असे आश्वासन शहा यांनी चंबा जिल्ह्यातील चौगान मैदानावरील सभेला संबोधित करताना दिले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. पाकिस्तानने ज्यावेळी पाच भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता, त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने काहीही केले नाही; पण मोदी सरकारने दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी पाकस्थित बालाकोटवर हवाई हल्ले केले. काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा हे हवाई हल्ल्याऐवजी दहशतवाद्यांसोबत चर्चा करण्याची गोष्ट करत आहेत. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीबाबत प्रश्न विचारण्यात आले तर काँग्रेसचे 'झाले ते झाले' असे उत्तर तयार आहे. मुंबईवरील २६/११ व काश्मीरमधील पंडितांच्या स्थलांतराबाबतदेखील ते असेच म्हणतात, अशी टीका शहा यांनी केली. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा पाढा शाह यांनी यावेळी वाचला. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर व भाजपचे वरिष्ठ नेते शांता कुमार यांची सभेला उपस्थिती होती..

Post Bottom Ad