मुंबई, दि. 16 : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध मृत पाणीसाठ्याचे नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करावा. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या सहाय्याने गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज संनियंत्रण करावे, अशा सूचना मुख्य सचिव यु.पी.एस.मदान यांनी आज येथे दिल्या.
मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल उपस्थित होते. मुख्य सचिवांनी टंचाईची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
राज्यात सध्या 4 हजार 329 टँकर्सद्वारे 3 हजार 379 गावे आणि 7 हजार 856 वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या आढावा घेवून मुख्य सचिव म्हणाले की, सध्या टँकर ज्या ठिकाणांवरुन भरले जातात तेथे पिण्याचे पाणी किती कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकेल, याचा आढावा यंत्रणेने तातडीने घ्यावा. त्याचबरोबर अन्य कुठल्या स्त्रोतावरुन पाणी उपलब्ध होऊ शकेल याबाबतची खातरजमा उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावी. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स मंजूर आहेत तेथे जीपीएसच्या सहाय्याने मंजूर फेऱ्यानुसार पाणीपुरवठा होत आहे की नाही याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दैनंदिन माहिती घ्यावी आणि आवश्यक त्या प्रमाणात पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावे.
पाणी टंचाईच्या अनुषंगाने तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना व नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे तेथे योजनांची कामे मुदतीत पुर्ण करुन गावे व वाड्यांना पिण्याचे उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी, असेही मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.