‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची ताकीद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2019

‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची ताकीद


मुंबई, दि. 16 : 'भाभीजी घर पर है' तसेच 'तुझसे हैं राब्ता' या दूरचित्रवाणी मालिकेच्या निर्मात्यांना संबंधित भागातून राजकीय पक्षाला लाभदायक ठरणारा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे तसेच समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे यासह कोणत्याही प्रकारच्या माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट असलेला भाग उपलब्ध असणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिले आहेत. अशा जाहिरात स्वरुपाचा मजकूर असल्यास, सक्षम प्राधिकाऱ्याकडून पूर्व प्रमाणित करुन घेतल्याशिवाय प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आणि भारत निवडणूक आयोगाच्या अन्य निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीद या मालिकांच्या निर्मात्यांना देण्यात आली आहे.

'अॅण्ड टीव्ही' या दूरचित्रवाणी वाहिनीवर 4 आणि 5 एप्रिल, 2019 रोजी प्रसारित झालेल्या 'भाभीजी घर पर है!' आणि 'झी टीव्ही' या वाहिनीवर  2 एप्रिल रोजी प्रसारित झालेल्या 'तुझसे हैं राब्ता' या मालिकेच्या भागामध्ये शासनाच्या योजना तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी संबंधित प्रचार आणि जाहिराती असल्याबाबत तक्रार काँग्रेस पक्षाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काँग्रेस पक्षाच्या तक्रारीच्या अनुषंगाने 'भाभीजी घर पर है!' चे निर्मितीगृह ‘एडीट II प्रॉडक्शन्स’चे बेनीफर कोहली व संजय कोहली आणि'तुझसे हैं राब्ता' च्या निर्मितीगृह ‘फूल हाऊस मीडिया’चे सोनाली पोतनीस आणि अमीर जाफर यांना नोटीस बजावून आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा मागविला होता.

या दोन्ही निर्मितीगृहांच्या निर्मात्यांनी दाखल केलेला खुलासा आणि मालिकांच्या संबंधित भागांचे चित्रीकरण पाहिल्यानंतर मालिकेतील मजकूर हा विशिष्ट राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या कामगिरीची जाहिरातबाजी करणारा असल्याचे तसेच त्याचा मतदारांवर प्रभाव पडू शकेल असा असल्याचे निदर्शनास आले. तसेच हा मजकूर पूर्वप्रमाणित करुन घेतला नसल्याचेही दिसून आले आहे. या भागातील मजकुरामुळे आदर्श आचारसंहितेतील नियम आणि तरतुदींचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बाबी लक्षात घेऊन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी या मालिकांच्या संबंधित भागातून आक्षेपार्ह मजकूर वगळण्यात यावा तसेच आक्षेपार्ह मजकूर असलेला संबंधित भाग कोणत्याही माध्यमावर उपलब्ध असणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कोणताही राजकीय पक्ष,उमेदवाराला लाभदायक ठरेल असा मजकूर प्रसारित करु नये, असे आदेश देण्यात आले असून जाहिरातबाजी करावयाची असल्यास मजकूर पूर्वप्रमाणित करुन घ्यावा; आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आणि भारत निवडणूक आयोगाच्या अन्य निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सक्त ताकीदही या मालिकांच्या निर्मात्यांना देण्यात आली आहे.

Post Bottom Ad