भाजप हा जातीयवादी पक्ष नसून सर्व जाती धर्मांचा पक्ष - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2019

भाजप हा जातीयवादी पक्ष नसून सर्व जाती धर्मांचा पक्ष - रामदास आठवले


मुंबई - भाजप हा जातीयवादी पक्ष नसून सर्व जाती धर्मांचा पक्ष आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात हा पक्ष कायम आमच्या सोबत राहिल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथील जाहीर सभेत भाषण करताना त्यांनी भाजपच्याआर्थिक आणि सामाजिक धोरणांवर स्तुतीसुमने उधळली. तर याच सभेला संबोधित करताना भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी काँग्रेस नेतृत्वा‌वर तोफ डागली. ज्यांचे पणजोबा, आजी, वडिल पंतप्रधान राहिले आहेत, शिवाय आईच्या हाती दहा वर्षे पंतप्रधान पदाचा रिमोट कंट्रोल होता, त्यांना त्यावेळी गरीबांसाठी काहीही करता आले नाही ते आता गरीबांचे भले करण्याची भाषा करत असल्याची जोरदार टीका मुंडे यांनी केली.

ईशान्य मुंबई मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचार मोहीमेच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. घाटकोपर येथे गुरूवारी पार पडलेल्या सभेतही केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर सभाघेत कोटक यांना मतदान करण्याचे आवाहन केले. आठवलेंनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर भाष्य केले. फडणवीस सरकारने मुंबईतील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत म्हणून मान्यता दिल्याने आता त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार झाला आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतील रमाबाई नगर, कामराज नगर, भांडूप, मुलुंड, कांजूरमार्ग,विक्रोळी पार्कसाईट या परिसरातील झोपडीधारकांना लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या याच कामगिरीमुळे ईशान्य मुंबईतील जनता कोटक यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही कोटक यांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले. केंद्रात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली भक्कम सरकार येण्याची गरज असल्याचे सांगत त्याम्हणाल्या की, कोटक यांना दिलेले प्रत्येक मत मोदी सरकारची केंद्रातील स्थिती भक्कम करेल. पुढे त्या म्हणाल्या की, भाजप हा अल्पसंख्यकांच्या विरोधातील पक्ष असल्याचा अपप्रचारविरोधकांनी कायमच केला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांतील भाजप सरकारच्या काळात एका तरी अल्पसंख्यकाला धक्का लागला का, याचे उत्तर आधी विरोधकांनी द्यावे. उलट काँग्रेस धर्माच्या नावावर तर त्यांचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे धर्म आणि जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या याअभद्र आघाडीला या राज्यातूनच नव्हे तर देशातून हद्दपार करा असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.

Post Bottom Ad