व्यापारी समुदाय मोदी सरकारच्या विरोधात, एकनाथ गायकवाड यांना जाहीर केला पाठिंबा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2019

व्यापारी समुदाय मोदी सरकारच्या विरोधात, एकनाथ गायकवाड यांना जाहीर केला पाठिंबा


मुंबई - मोदी सरकारच्या नोटबंदीसारख्या निर्णयामुळे तसेच जीएसटीसारख्या निर्णयाच्या घिसाडघाईने झालेल्या अंमलबजावणीमुळे मुंबईसह देशातील व्यापारीसमुदाय मोदी सरकारच्या विरोधात एकवटत आहे. याचीच प्रचिती मुंबईतही येत असून माटुंगा परिसरातील अडीचशे व्यापारी मोदींविरोधात एकवटले आहेत. यासर्व व्यापाऱ्यांनी काँग्रेस महाआघाडीचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी अनेक व्यापारी बंधुंनी मोदी सरकरच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे दिवास्वप्न पाहत असतानाच देशभरातील व्यापारीवर्ग मात्र मोदीसरकारच्या आर्थिक धोरणावर कमालाचा नाराज असल्याचे चित्र आहे. याउलट काँग्रेसच्या आर्थिक धोरणांमुळेच व्यापारात प्रगती होत असल्याचा सूरही व्यापारीवर्गात ऐकू येत आहे. मुंबईतील माटुंगा परिसरातील व्यापारी वर्गाचीही हीच भावना असून तब्बल अडीचशे व्यापाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना पाठिंबा जाहिर केला आहे. या बैठकीला खुद्द एकनाथ गायकवाडही उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना गायकवाड म्हणाले की, २०१४ मध्ये सत्तेवर येताच मोदींनी व्यापारातून देश मोठा करण्याचे स्वप्न दाखवले होते. व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या अधारेच प्रगती होते, व्यापार बंद करून कधीही कुठल्यादेशाची प्रगती झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच पाच वर्षांपुर्वी जेव्हा मोदी म्हणाले होते की, माझ्या रक्तातच व्यापार असल्याने मी व्यापाराला प्राधान्य देणार,त्यावेळी मीही प्रभावित झालो होतो. मात्र त्यानंतर मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीची ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली त्यामुळे माझा पुरताभ्रमनिरास झाला. माझ्यासारखीच भावना इथल्या व्यापाऱ्यांची असल्याने यावेळी संपुर्ण व्यापारी समुदाय काँग्रेसच्या पाठिशी उभा राहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदींमुळे देश व्यक्तीकेंद्री झाला. संसदेतील प्रश्नोत्तराचा तास महत्वाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी प्रश्नोत्तराच्या तासाला दांडी मारतात.त्यांच्या या आत्मकेंद्री स्वभावानुसार ते एकट्याच्याच मतानुसार निर्णय घेतात. आणि मोदींचे शिक्षणही यथातथाच असल्याने पुढे त्यांनी घेतलेले निर्णयफसतात. नोटबंदी हे सपशेल अपयशी ठरलेले उदाहरण आपल्या समोर असल्याचा टोलाही एकनाथ गायकवाड यांनी लगावला. याउलट काँग्रेसने महात्वाकांक्षीयोजना राबवल्या. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षेचा कायदा केला. भाजपने मात्र ढोंगी साधूंना संसदेत आणले. त्यामुळे प्रगतीसाठी पुन्हा एकदा काँग्रेसला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणे अपेक्षित होते, मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत.

Post Bottom Ad