मुंबई - इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्याकडून तिकीट आरक्षित केल्यावर मोफत विमा प्रवाशांना मिळत होता. मात्र आता ४९ पैसे मोजून प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून रेल्वे तिकीट आरक्षित करून विमा सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ४९ पैसे मोजावे लागत आहेत. संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करताना रेल्वे प्रवाशांना विम्याचा पर्याय उपलब्ध असतो. यासाठी ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागतो. यावरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना विम्याचा लाभ घेता येतो. रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या प्रवाशाला या योजनेअंतर्गत १० लाखांचा विमा मिळेल. अर्ध अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रूपये मिळतील. तर रुग्णालयातील उपचारांसाठी अतिरिक्त दोन लाख रुपयांचा विमा मिळेल. विमा योजनेअंतर्गत हा फायदा प्रवाशांना मिळणार असला तरी त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होणे गरजेचे आहे, असे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.