मुंबई - यंदाची निवडणुक ही फक्त विकासाच्या मुद्द्याची निवडणुक नसून राष्ट्रीय अस्मितेचीही निवडणुक आहे, राष्ट्रीय सुरक्षा हा देखील या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कणखर सरकार बनवण्यासाठी मोदींनाच मते द्या असे आवाहन मतदारांना केले आहे. आताचे भारताचे सरकार हे केवळ चर्चा करणारे सरकारराहिले नसून, शत्रुला तोडीस तोड जबाब देणारे सरकार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. ईशान्य मुंबईचे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. या सभेतील भाषणात फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची उजळणी करतानाच विरोधकांवरही तोफ डागली.
विजय संकल्प सभेतील भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी राहूल गांधी यांना लक्ष्य केले. साठ वर्षांनंतरही ‘गरीबी हटाओ’चा नारा देताना यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल करत ते म्हणालेकी, गरीबीच्या विरोधात खऱ्या अर्थाने जर कोणी लढा दिला असेल तर तो मोदीनींच दिला. जनधन खात्याच्या माध्यमातून मोदींनी देशातल्या ३४ कोटी लोकांचे बँक खाते उघडले. तसेच गेल्यापाच वर्षांत पुर्वीची सर्व भ्रष्ट व्यवस्था मोडीत काढत तब्बल ८० हजार कोटी रुपये थेट या खात्यांमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय स्वच्छभारत योजनेच्या माध्यमातून अवघा देश स्वच्छ तर झालाच, पण प्रतिमाणशी शौचालयाचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ९८ टक्क्यांवर गेल्याचेही ते म्हणाले. उज्वला योजनेच्या माध्यमातून १३ कोटीपरिवारांना नव्याने गॅसची सुविधा प्राप्त झाली. तसेच पंतप्रधान आवास योजनेद्वारे २०११ पासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रत्येकाला किमान ३०० वर्ग फुटाचे घर देणार असल्याची हमीहीत्यांनी दिली. विशेष म्हणजे या योजनेला घाबरून काँग्रेसच्या युवराजांनी मुंबईतील प्रत्येक बेघर व्यक्तीला किमान ५०० वर्गफुटाचे घर देण्याची घोषणा केली. मात्र मुंबईतील प्रत्येकाला पाचशे वर्गफुटाचे घर दिल्यास मुंबईतील सर्व मोकळी जागा संपून काही प्रमाणात समुद्रावरही अतिक्रमण करावे लागेल, याचे भान राहुल गांधींना नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्या न्याय योजनेचा काँग्रेसवाले गाजावाजा करत आहे, त्या योजनेचे ७२ हजार कसे देणार असे विचारले असता राहुल गांधी निरूत्तर झाले. काळ्या पैशावर घालाआणून मोदींनी जो पैसा देशाच्या तिजोरीत आणला तो पैसा तुम्हाला वाटायला देण्याऐवजी भारताची जनता मोदींनाच पुन्हा संधी देईल,असा दावाही त्यांनी केला. कारण काँग्रेसच्या राजवटीतआजवर कुणालाच काहीही मिळालेले नाही, हे जनता चांगलीच जाणून असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरेंच्या प्रचाराचा समाचार घेतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. यांचीभाषणे इतकी गंमतीदार होतात की, भविष्यात या भाषणाआधी आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी ही भाषणे दाखवतो अशी सुचनाही वृत्तवाहिन्या दाखवतील असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राज यांचेनाव न घेता लगावला. आपल्या भाषणाची सांगता करताना मुख्यमंत्र्यांनी ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांना मत देण्याचे आवाहन केले. कोटक यांना मत दिल्यास त्याची ताकद मोदींना मिळेल, त्यामुळे सुरक्षित आणि विकसित भारतासाठी मोदींना मत द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई बदलतेय…
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी बदलत्या मुंबईचाही उल्लेख केला. मुंबईत आज मेट्रोचे जाळे उभे राहत आहे. याशिवाय मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसाठी गेल्या पाच वर्षांत ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद मोदी सरकारच्या काळात झाली. या निधीतून मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात सरकते जिने, नवे फलाट, आणि इतर सर्व सुविधा येत्या दोन तीन वर्षांत उभ्या राहतील अशीग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आज प्रतीदिन ७० लाख प्रवाशी वाहून नेण्याची असलेली मुंबई उपनगरीय रेल्वेची प्रवाशी क्षमता येत्या दोन तीन वर्षांत दीड कोटी प्रवाशांपर्यंत वाढेल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे मुंबईतील, रेल्वेसेवा, बससेवा, मेट्रोसेवा यासारख्या सर्व सेवांसाठी इंडीग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा अवलंब केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.