मुंबई - जळगावमधील भाजपच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांकडूनच माजी आमदाराला हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री मुंबईतील मानखुर्द भागात भाजपच्या दोन गटांतील कार्यकर्ते मानापमानावरून भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या नेत्याचे नाव पुकारले नाही म्हणून एका गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला भर कार्यक्रमातच जाब विचारला. त्यामुळे शाब्दिक चकमक होऊन वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कार्यक्रमस्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली. मात्र, या प्रकाराविषयी अद्याप कोणाचीही तक्रार आलेली नसून तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना मानखुर्द पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त शशी मीना यांनी दिली.