मुंबई - ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव हा आजच्या तरुण पिढीला मिळणे फार आवश्यक असून त्यांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने त्यांचा सन्मान हा सातत्याने होण्यासोबतच तो प्रत्येक मुंबईकरांच्या कृतीतूनही दिसला पाहिजे असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ माटुंगा (प.) च्या यशवंत नाटय मंदिरात आज (दिनांक ०१ ऑक्टोंबर २०१८) आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा स्मिता गावकर, जी/उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षा मरिअम्माल थेवर, नगरसेविका हर्षला मोरे, मुमताज खान, नगरसेवक वसंत नकाशे, ज्येष्ठ नागरिक संघाचे (फेसकॉम) अध्यक्ष शरद डिचोलकर, सचिव विनायक खांबेटे, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्र.) अशोक खैरनार, सहाय्यक आयुक्त (नियोजन) डॉ.संगीता हसनाळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रारंभी वयाचे ९० वर्ष पूर्ण केलेल्या सदाशिव सहस्त्रबुध्दे, गोविंद धारगळकर, विनायक कामत, सुमती सावंत, एम.पी खेडकर, विनायक पिंगळे, प्रमिला राऊत या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना खरी गरज ही माया, आपुलकी, प्रेमाची असते. आपण सुध्दा एक वेळा ज्येष्ठ होणार आहोत हे सदैव प्रत्येकाने ध्यानात ठेवावे, असेही महापौरांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना‘बेस्ट’ च्या बस भाडयामध्ये यापुढे ५० टक्के सुट देण्याचे प्रशासकीय स्तरावरील काम पूर्ण झाले असून लवकरच बेस्ट सवलत सुरु करणार असल्याचे महापौरांनी यावेळी जाहिर केले. प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात तारुण्य, संपत्ती, सौंदर्य, सत्ता याचा कधीही अहकांर न बाळगता आपण समाजव्यवस्थेचे एक घटक असून लोककल्याण हा आपला उद्देश असला पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला चांगले आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा महापौरांनी दिल्या.