मुंबई - शहरात गणेशोत्सवात परवानगी न घेता बेधडक बेकायदा मंडप उभारण्यात येतात. अशा बेकायदा मंडप उभारणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उपनगरात बेकायदा उभारण्यात आलेल्या आणि शेवटच्या दोन दिवसांपूर्वी ४४ मंडप नियमित केल्याची कबुली पालिकेने गुरुवारी न्यायालयात देताना हे मंडप नियमित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी हमीच महापालिकेने न्यायालयात दिली.
विविध उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी याचिकाकर्त्यांनी उपनगरातील बेकायदा मंडपांची संख्या दोन दिवसांत २१७ वरून २६४ पर्यंत पोहचल्याचा आरोप केला. या वेळी पालिकेने मुंबई उपनगरातील ४४ बेकायदा मंडप १३ अधिकाऱ्यांनी नियमित केल्याची कबुली न्यायालयात दिली. तसेच या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. तसेच नवरात्रो उत्सवात बेकायदा उभारण्यात येणाऱ्या मंडपांविरोधात आतापासूनच कारवाई सुरू केल्याची माहिती दिली. याची दखल न्यायालयाने घेऊन बेकायदा मंडप नियमित करणाऱ्यांविरोधात कारवाई करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करून याचिकेची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब ठेवली.