मुंबई - महापालिकेच्या एफ/दक्षिण विभागाच्या वतीने नायगाव येथील व्हीपएलटी ६०, एस. एस. वाघ मार्ग व दहीवलकर बुवा मार्ग येथील स्वामी समर्थ एंटरप्रायजेस आवारातील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा पडला आहे. या कारवाईत २० गाळे आणि २० पोटमाळे तोडल्यामुळे ३ हजार चौरस मीटर जागा मोकळी झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी दिली.
महापालिकेच्या मालकीच्या जागेवर दोन वर्षांपासून उभारलेल्या अनधिकृत इमारतीमध्ये २० गाळे व २० पोटमाळ्यांसह तळ मजला व एक मजली अच्छादित टेरेस इमारत अनधिकृतरित्या बांधली होती. ती इमारत पाडून येथील जागा परत मिळवण्यास महापालिकेला यश आल्याचे किशोर देसाई यांनी सांगितले. नायगाव परिसरात महापालिकेच्या मालमत्ता विभागाची सुमारे ३ हजार चौरस मीटर इतकी जागा आहे. या जागेवर हे गाळे आणि पोटमाळे बेकायदेशीररित्या दोन वर्षांत उभारण्यात आले होते. या इमारतीतील २० गाळे पोटगाळेधारकांना ३५४ ए नुसार नोटीस बजावण्यात आली व बजावलेल्या नोटिसीनुसार इमारतीतील सर्व अनधिकृत गाळेधारकांवर तोडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आणि महापालिकेचे दुय्यम अभियंता बी. एल. शिंगणे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र गवळी, सहाय्यक अभियंता एस. जी. मालेकर या वेळी उपस्थित होते. १६ कामगार, १ ट्रक, ७ जेसीबी, वेल्डिंग मशीन व गॅस कटरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.