नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता घरबसल्या ऑनलाइनच्या विविध सुविधा मिळू शकत आहेत. त्यात एक महत्त्वाची सुविधा आता चालू करण्यात आली आहे, त्यामुळे बँकेच्या एखाद्या शाखेतून अन्य शाखेमध्ये आपले खाते वळवण्याचे कामही आता करता येणार आहे.
बचत खाते जर तुम्हाला तुमच्या मूळ शाखेतून अन्य शाखेत ट्रान्सफर करायचे असेल, तर त्यासाठी दोन्ही संबंधित शाखांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज पडणार नाही. मात्र त्यासाठी तुमचे खाते हे नेट बँकिंगद्वारे तुम्हाला चालू करावे लागेल वा तुम्ही तुमच्या खात्यासाठी नेट बँकिंगची सुविधा वापरत असणे गरजेचे असेल. बचत खाते तुम्हाला तुमच्या ज्या शाखेमध्ये सुरू केले आहे वा ज्या शाखेशी ते खाते संलग्न आहे, त्याऐवजी अन्य शाखेमध्ये ते ट्रान्सफर करायचे असेल तर तुम्हाला ऑनलाइन करणे शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्ही बँकेच्या साईटवर आल्यानंतर लॉगइन करावे व होम पेजवर ई-स्व्हिहसचा पर्याय आहे तेथे क्लिक करावे त्यानंतर तेथे ट्रान्सफर ऑफ सेव्हिंग अकाऊंट हा पर्याय दिसेल तेथे क्लिक करून तुम्ही एका नव्या विंडोमध्ये जाल तेथे तुमच्या विद्यमान बचत खात्याचा तपशील दिसून येईल व ते खाते आपल्याला अन्य शाखेत ट्रान्सफर करावयाचे आहे, तेच खाते आहे ना, याची खात्री करावी. त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक करावे व ते खाते निवडा. त्यानंतर तुम्हाला ज्या शाखेत खाते ट्रान्सफर करावयाचे आहे, त्या शाखेचा कोड तुम्हाला तेथे टाकावा लागेल व नंतर गेट ब्रँच नेम यावर क्लिक करावे. त्यानंतर त्या शाखेचा तपशील तुम्ही पाहू शकाल व त्यानंतर तुमच्यापुढे अटी असतील त्या स्वीकाराव्या लागतील व सबमीट करून सर्व तपशील कन्फर्म करावे लागतील. हे सारे कन्फर्म केले की तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सिक्युरिटी कोड येईल व तो कोड तुम्हाला एंटर करावा लागेल व पुन्हा तो कन्फर्म करावा लागेल. हे झाल्यानंतर तुमच्यापुढे नवी विंडो ओपन होईल व ट्रान्सफर न्फर्म झाल्याचा संदेश तुम्हाला मिळेल, त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल व तेथे तुम्हाला तुमचे खाते अन्य इच्छित शाखेत ट्रान्सफर झाल्याचा संदेश दिसेल. स्टेट बँकेच्या या नव्या सुविधांमुळे बदली झाल्यानंतर वा घर बदलल्यानंतर वा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये राहावयास गेल्यानंतर तुम्हाला मूळ बँक शाखेमध्ये न जाता तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये तुमचे बचत खाते हस्तांतरित करता येणे शक्य होणार आहे.