शीव रुग्णालयातल्या प्रसूतिगृहात झुरळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2018

शीव रुग्णालयातल्या प्रसूतिगृहात झुरळ


मुंबई - महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात कपडे धुवून न आल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्याचे प्रकरण नुकतेच उघडकी आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता चक्क प्रसूतीगृहात वाढलेल्या झुरळांच्या उपद्रवामुळे नवजात बाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबाबत बुधवारी आरोग्य समितीत जोरदार पडसाद उमटले. यावर येत्या २४ तासांत या विभागात पेस्ट कंट्रोल करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आरोग्य विभागाच्या या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जातो आहे.

शीव रुग्णालयात काही दिवसांपूर्वी रुग्णांचे लॉण्ड्रीमधून कपडे धुवून न आल्यामुळे ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता याच रुग्णालयाच्या प्रसूूतीगृहात जेथे लहान अर्भक जन्म घेतात तेथे चक्क झुरळांचा सुळसुळाट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पेस्ट कंट्रोल यंत्रणा आहे, मात्र या विभागाच्या शेड्युल्डमध्ये झुरळांवर पेस्ट कंट्रोल करण्याचे नसल्याने याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र, झुरळांचा उपद्रव वाढला असताना त्यावर खासगी कंत्राटदाराकडून पेस्ट कंट्रोल करून घेण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे झुरळांचा उपद्रव वाढल्याने या विभागात जन्म घेणाऱ्या छोट्या अर्भकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. झुरळांमुळे छोट्या बाळांना संसर्ग होण्याची भीती आहे. असे असताना खासगी पेस्ट कंटोल करून न घेता केवळ झुरळांवर पेस्ट कंट्रोल करण्याचे शेड्युल्डमध्ये (यादीत) नसल्याने दुर्लक्ष केले. याबाबत बुधवारी पालिकेच्या आरोग्य समितीत जोरदार पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी बुधवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले. या हरकतीच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या हलगर्जीपणावर जाब विचारल्यानंतर प्रशासनाने आपली बाजू सावरत येत्या २४ तासांत येथील रुग्णांना शिफ्ट करून या विभागाचे पेस्ट कंट्रोल करून घेतले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. २४ तासात पेस्ट कंट्रोल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सईदा खान यांनी दिला आहे. तसेच  काँग्रेस पक्षानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जाईल असे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी कळविले आहे. 

Post Bottom Ad