शीव रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2018

शीव रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर'


मुंबई - मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयांत दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. या शस्त्रक्रिया कक्षामध्ये प्रामुख्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाणार आहे तसेच जीवाणू व बुरशी प्रतिबंधक व हवा शुद्ध करण्याची व्यवस्थाही असणार आहे.

शीव परिसरातील लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश होतो. या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयातील विविध विभागांमध्ये असणाऱ्या शस्त्रक्रिया कक्षांपैकी मूत्रशल्यचिकित्सा विभागातील दोन शस्त्रक्रिया कक्ष आता अत्याधुनिक अशा मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या विशेष उपस्थितीत नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या या शस्त्रक्रिया कक्षांमध्ये प्रामुख्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. प्रत्यारोपणासारख्या तुलनेने आव्हानात्मक शस्त्रक्रियांसाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे शास्त्रीयदृष्ट्या अधिक चांगले मानले जातात व यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जंतुसंसर्गाची शक्यता तुलनेने कमी असते, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजात प्रस्तावित करण्यात आल्यानुसार लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील २ शस्त्रक्रिया कक्ष हे आता जर्मन तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक अशा मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना मूत्रपिंड देणाऱ्या व घेणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने मूत्रशल्यचिकित्सा विभागातील दोन शस्त्रक्रिया कक्ष एकाच वेळी मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व मूत्रशल्यचिकित्सा विभागातील जटिल शस्त्रक्रियांसाठी या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा उपयोग करण्यात येणार असून यात दिवसाला साधारणपणे १० शस्त्रक्रिया करता येतील.

मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची वैशिष्ट्ये -
मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये हवा शुद्ध करणारे अत्याधुनिक यंत्र असणार आहे. ज्यामुळे हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. तसेच दोन्ही शस्त्रक्रिया कक्षांमध्ये असणाऱ्या ऑपरेशन टेबलच्या वर छायाचित्रण कॅमेरे बसवण्यात आले असून ते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असणाऱ्या दूरचित्रवाणी संचाला जोडण्यात आलेले आहेत. ज्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मार्गदर्शन मिळू शकणार आहे.

Post Bottom Ad