मुंबई – दहिसरच्या रुस्तमजी ट्रुपर्स स्कूलमधील अवाजवी फीवाढी विरोधात पालकांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याकरिता शिवसेना – युवासेना विभाग क्र.1 तर्फे आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली या शाळेसमोर आज सकाळी उग्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पालक सहभागी झाले होते.
शिवसेना शिष्टमंडळाने आंदोलनानंतर रुस्तमजी व्यवस्थापनाची भेट घेतली. या शाळेचे संस्थाचालक परदेशी गेेले असल्याने शाळेचे प्रतिनिधी प्रविण शेट्टी यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर येत्या आठ दिवसांत फीवाढी संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आमदार विलास पोतनीस यांनी दिला.
स्तमजी ट्रुपर्स स्कुल, दहिसर या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेविरुद्ध अनेक अनियमितता व लेखी तक्रारी पालकांनी शिवसेना व युवासेनेकडे दाखल केल्या होत्या. सदर शाळेत पहिलीच्या शाळा शुल्कामध्ये 10% वाढ पालक व शिक्षक संघटनेच्या सहमतीने 2016 मध्येच मान्य करण्यात आली होती. ही वाढ शाळेने इयत्ता पहिलीच्या शुल्कावर करणे अपेक्षित होते. परंतु, शाळेने ही वाढ सिनियर के.जी च्या शुल्कावर केली. तसेच दुसरी ते पाचवी इयत्तेमध्ये जी शुल्कवाढ करण्यात आली ती आधीच्या इयत्तेच्या शुल्कावर करण्यात आली असून शुल्क विनिमय कायद्याप्रमाणे ती नियमबाह्य आहे. सदर प्रकरणाची दखल घेत शिवसेना व युवासेनेने शिक्षणाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या आंदोलनात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा रिध्दी खुरसंगे, नगरसेवक शितल म्हात्रे तसेच सर्व शाखाप्रमुख, महिला शाखासंघटक, युवासेना, भा.वि. सेना कार्यकर्ते सहभागी झाले होते.