नवी दिल्ली - विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांचा सराव ऑनलाईन व्हावा, यासाठी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयातर्फे देशभरात 3400 ‘चाचणी सराव केंद्र’ सुरू करण्यात आलेली आहेत. त्यापैकी, महाराष्ट्रात 325 ‘चाचणी सराव केंद्रे आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिल्ली येथून देशभरात सुरू करण्यात आलेल्या चाचणी सराव केंद्राचे उद्घाटन गुगल हँगआऊटद्वारे केले. 622 जिल्ह्यांमध्ये एकूण 3400 चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये 325 चाचणी सराव केंद्र राहतील. या सराव केंद्राचा लाभ 689 केंद्रीय विद्यालय, 403 जवाहर नवोदय विद्यालयांनाही होणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या माध्यमातून चाचणी सराव केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. एनटीएकडून प्रॅक्टिस ॲपही तयार करण्यात आले आहे. विद्यार्थी याचाही उपयोग करू शकतील.
उच्च शिक्षणासाठी विविध प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात. यासाठी विद्यार्थ्यांचा सराव व्हावा, म्हणून चाचणी सराव केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमाने सर्वच स्तरातील विद्यार्थी प्रवेश परीक्षेपूर्वी वारंवार सराव करून तयार होतील. यामध्ये पूर्ण पारदर्शकता पाळली जाईल.
‘चाचणी सराव केंद्र’ दर शनिवारी आणि रविवारी सुरू राहतील. दर शनिवारी या केंद्राची वेळ 02:30 ते 5:30 अशी असणार आहे. तर दर रविवारी दोन शिफ्टमध्ये 11:00 ते 02:00 आणि 02:30 ते 05.30 या वेळेत सुरू राहतील. एका वेळी केंद्रात किमान 30 संगणक किंवा लॅपटॉप इंटरनेट कनेक्शनसह उपलब्ध राहतील. एसएमएसद्वारे विद्यार्थी आपले नाव नोंदवून सराव केंद्राचा लाभ घेऊ शकतील.