राम कदम यांची महिला आयोगाकडे बिनशर्त माफी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2018

राम कदम यांची महिला आयोगाकडे बिनशर्त माफी


मुंबई- वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी आपला खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेकेला असून त्यानुसार त्यांनी आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही दिली आहे. आमदार कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  विजया रहाटकर यांनी दिली.

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. त्यानुसार आमदार कदम यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर केला असून आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे.

"मी यापूर्वीही महिलांची बिनशर्त माफी मागितली असून महिला आयोगाच्या माध्यमातून माता - भगिनींची बिनशर्त माफी मागत असताना आयोगाला एवढेच आश्वस्त करू इच्छितो की आई-वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि प्रत्येक स्त्री साक्षात लक्ष्मी आहे, हा संदेश रुजविण्यासाठी मी प्रयत्न करीत राहीन," असे आमदार कदम यांनी खुलाशात नमूद केले आहे. 

महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली होती. त्यानंतर त्यांना आयोगाने नोटिस बजावली होती.

Post Bottom Ad