नवी दिल्ली - रेल्वे लाईनचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने जे इंधन वाचणार आहे, त्यामुळे रेल्वेची वार्षिक १३ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसेच वार्षिक ३४ लाख टन कार्बन उत्सर्जन देखील कमी होणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे.
ते नीती आयोगाच्या सहयोगातून रेल्वे मंत्रालयाद्वारा आयोजित 'ई-मोबिलिटी इन इंडियन रेलवेज' (रेल्वेचे विद्युतीकरण) कार्यक्रमात बोलत होते. रेल्वे विद्युतीकरण मोहिमेमुळे आतापर्यंत ७५०४ कोटींची बचत झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ते म्हणाले की, भारतीय रेल्वेने आता सौर ऊर्जा उद्दिष्टात वाढ करण्याची गरज असून या क्षेत्रात देशाला दिशा देण्याची भूमिका बजावली पाहिजे. पंतप्रधानांच्या स्वच्छ अणि हरित ऊर्जा दृष्टीकोनाचे रेल्वेने पालन केले पाहिजे. तसेच रेल्वेने इथेनॉल मिसळीबाबतही विचार करण्याची गरज आहे. रेल्वेचा खर्च कमी करण्याच्या एक उपक्रम म्हणून रेल्वे विद्युतीकरणाकडे पाहिले जात आहे.