मुंबई - मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचे नियम तोडल्याने होणारे अपघात आणि त्यातून हाणामारीचे प्रकार वाढत आहेत. अशाच प्रकारे कुल्र्याच्या ठक्कर बाप्पा कॉलनी येथे एका इसमाला दुचाकीस्वारांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संपत बाबू सोनावणे (४३, रा. नाईकनगर, चेंबूर) असे मृत इसमाचे नाव असून त्यांचा सजावटीचे साहित्य बनविण्याचा व्यवसाय आहे.
सोमवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान संपत हे ठक्कर बाप्पा जंक्शन येथील रस्ता पार करत असताना उलट्या दिशेने दुचाकी चालवत आरोपी महेंद्र ऊर्फ राहुल रमेश बाबारिया (२३,रा. न्यू म्हाडा कॉलनी, चुनाभट्टी) आणि अनोज अरुण बनसोडे (२२, रा. स्वदेशी मिल सायन, चुनाभट्टी रोड येत होता. या वेळी त्याचा धक्का संपत यांना लागला असता आरोपीनेसंपत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी आरोपी राहुल बाबारिया याने संपत यांना मारहाण केली असता ते जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना त्वरित घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून त्यांना त्वरित घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी संपत यांना त्रास होऊ लागला, तेव्हा त्यांना पुन्हा राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु राजावाडी रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने संपत यांच्यावर उपचार न करताच त्यांना सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारास पाठविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यानच रविवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. यात सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेऊन तसेच खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. यात मुख्य आरोपी असलेल्या राहुल बाबारियावर याअगोदर विविध पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच तो ही घटना घडताच पनवेल येथील आशा किरण फाऊंडेशनच्या नशा मुक्ती केंद्रात दाखल झाला होता. त्याच्या शोधात नेहरूनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून शोध सुरू केला. पनवेल येथे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पनवेल येथून राहुलला अटक केली, तर चुनाभट्टी येथून अनोजला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यातील दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेमुळे विभागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे या विभागात वाहतुकीचे नियम तोडून दादागिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच पालिकेच्या रुग्णालयात लवकरात लवकर उपचार न झाल्याने संपत यांचा नाहक जीव गेला असल्याने आरोपींबरोबरच पालिका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.