मुंबई - मुंबईत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत १९५ नवीन रुग्ण आढळले असून, महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील झोपडपट्टी, चाळी तसेच बांधकामांच्या ठिकाणी कुष्ठरोग शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईतून कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याची मोहीम राज्य शासनाने आणि पालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी केंद्र शासनाकडून ८४ लाखांचे अनुदान मिळणार आहे.
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुष्ठरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी लवकर निदान व लवकर उपचार होणे हे अत्यंत गरजेचे आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार २०१५ रोजी समाजातील लपलेले, न शोधण्यात आलेले कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी 'लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन' (एलसीडीसी) साठी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती तर ५ सप्टेंबर २०१६ रोजी राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये घरोघरी ही मोहीम राबवण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात येणार असून मुंबईत पाहिल्यांदाच ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यांची लोकसंख्या १ कोटी ३७ लाख असून जिल्ह्यांचे दर १० हजारी कुष्ठरोग प्रमाण ०.२२ इतके आहे. जिल्ह्यात दरवर्षी ३.१७ नवीन कुष्ठरोगी प्रति लाख लोकसंख्येत निदानीत होतात. वर्षात दर लाख कुष्ठरुग्ण प्रमाण ३.१७ आहे. मुंबई जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०१८ पर्यंत एकूण १९५ नवीन रुग्ण शोधण्यात आले.
मुंबई जिल्ह्यात एकूण ११ कुष्ठरोग संस्था कार्यरत असून चार पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथक अनुक्रमे बोरिवली, कांदिवली, अंधेरी, स्टॅण्डहर्स्ट रोड येथे कार्यरत आहे. सहा स्वयंसेवी संस्थाही कार्यरत आहेत तसेच मुंबई महापालिकेच्या अक्वर्थ म्युनिसिपल हॉस्पिटलचा यात समावेश आहे. या मोहिमेत १ स्त्री व १ पुरुष स्वयंसेवक असे चमू तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील झोपडपट्टी ,चाळी, बांधकाम ठिकाणे आदी ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार असून कुष्ठरोगींवर उपचारही करण्यात येणार आहेत. पात्र अपंग कुष्ठरुग्णांना रेल्वे प्रवास सवलत, बस प्रवास सवलत पुरवण्यात येते तसेच ६० वर्षांवरील निराधार अपंग कुष्ठरुग्णांना संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना इ. लाभ देण्यात येतात तसेच मुंबई महापालिकेकडून ४० टक्क्यांपेक्षा जास्त विकृती असलेल्या कुष्ठरुग्णांना प्रति माहिना १००० रुपये पेन्शन देण्यात येते, असे डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.
स्वयंसेवकाला ७५ रुपये -
कुष्ठरोगींचे सर्वेक्षण करणाऱ्या पथकातील प्रत्येक स्वयंसेवकाला प्रतिदिन ७५ रुपये आणि त्यांच्या पर्यवेक्षकांनाही रोज १३० रुपये मानधन मिळणार आहे.