मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापुढे काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारीतून मुक्त केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी दिला.
पक्ष कार्यकर्त्यांसाठी त्यांनी फेसबुकवर सविस्तर पत्र लिहून हा इशारा दिला आहे. यापुढील काळात आपल्याला पक्षात अनेक सुधारणा कराव्या लागतील. गुणी, कर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी आणि जबाबदारी दिली जाईल. पक्षाचे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी काय काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी केले जाईल. गरज पडल्यास काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचाही पक्षाचा विचार आहे. पक्षाच्या विविध सेल्सनी यापुढील काळात आधीपेक्षा अधिक सक्रिय राहून काम करायला हवे.
राज्याच्या विविध भागांत अनेक जण चांगले काम करू पाहात आहेत, त्यांना संधी देण्याची पक्षाची इच्छा आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.यापुढील काळातही अधिकाधिक महिलांना सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी कशी देता येईल, याचा विचार आपण सर्वांनी मिळून करायला हवा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या समाजाच्या सर्व स्तरांतील युवक-युवतींना आपण पक्षात प्राधान्याने काम करण्याची संधी द्यायला हवी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना या आधीही पक्षात कोणतेही स्थान नव्हते आणि यापुढेही पक्षात कोणतेच स्थान नसेल, असे पाटील यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
यापुढील काळात राष्ट्रवादीची बूथ स्तरावरील रचना मजबूत करण्याला पक्षात संपूर्ण प्राधान्य दिले जाईल. बूथ स्तरावर काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता हाच या पक्षाचा केंद्रबिंदू आहे. बूथ रचनेसाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचा संपूर्ण वापर सर्वांनी करायचा आहे. या ॲपद्वारे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेतृत्वापर्यंत संदेश पाठवता येईल आणि पक्ष नेतृत्वालाही पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणताही निरोप पोहोचवता येईल. बूथ रचनेला प्राधान्य देताना या व्यवस्थेतून पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला पक्षातील महत्त्वाच्या उच्च पदांवर काम करण्याची संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे, असेही ते म्हणाले.