मुंबई - मुंबईला प्राणवायू देणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देशातीलच नव्हे तर जगातील एक आदर्श राष्ट्रीय उद्यान व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यात सर्वांचे योगदान अपेक्षित असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आयोजित कार्यक्रमात वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनमंत्र्यांनी अभिनेत्री रविना टंडन यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उद्यान राजदूत म्हणून अधिकृत घोषणा केली. त्यांनी श्रीमती टंडन यांना उद्यान राजदूत पदाचा सॅश तसेच पर्यावरणस्नेही पद्धतीने करण्यात आलेल्या ३ डी प्रिंटेड बिबट्याची प्रतिकृती प्रदान केली.
कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री मनिषा चौधरी, प्रकाश सुर्वे, प्रविण दरेकर, सरदार तारासिंग, वन विभागाचे सचिव विकास खारगे, अनेक स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, उद्यानाला ई बग्गी भेट देणारे महेंद्र मोरे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे आणि त्यांचे सहकारी, उद्यानातील आदिवासी पाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविना टंडन यांनी धन को नही वन को महत्व दिया असं सांगत मुनगंटीवार म्हणाले की, टंडन या उद्यान राजदूत झाल्याने उद्यानाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल. आज रविना टंडन यांनी एक बिबट दत्तक घेतले आहे. त्यांच्या पुढाकारातून या कामास आणखी गती मिळेल. त्या स्वत: उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्रकार आहेत. त्यांनी स्वत: काढलेली छायाचित्रे रुद फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यातून येणारा निधी त्या उद्यानाच्या विकासासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी वापरणार आहेत. सामाजिक दायित्व निधी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील असून यातूनच त्यांनी उद्यानाला ई बग्गी उपलब्ध करून दिली आहे.
जगाच्या पाठीवर राष्ट्रीय उद्याने किंवा वने खूप आहेत परंतु मुंबईसारख्या महानगरात, दाटीवाटीच्या लोकसंख्येत वसलेले हे १०३ चौ.कि.मी चे जंगल खूप वेगळे आहे, असे कुठही आढळत नाही. हे मुंबईला आरोग्यसंपन्न प्राणवायू देणारे, मुंबईचे हे फुफ्फुस आहे. देशात सर्वाधिक आयकर जमा करणारे शहर मुंबई आहे. या शहरातील १२ टक्के नागरिकांना या उद्यानातील जलाशयाचे पाणी पिण्यासाठी मिळते. अशा या उद्यानाची जपणूक करण्यासाठी, पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
नोटा मोजताना काही वेळ श्वास बंद करून नोटा मोजल्या तर आपल्याला अर्थशास्त्र मोठे की पर्यावरणशास्त्र मोठे याचे उत्तर मिळते असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, पर्यावरण, वन्यजीवांचे रक्षण आणि संवर्धन ही जगाची आवश्यकता झाली आहे. आपल्या सर्व संतांनी आणि धर्मग्रंथांनीही याचे महत्त्व विशद केले आहे. अलीकडच्या काळात शासनासह अनेक स्वयंसेवी संस्था,समाजातील घटकांनी याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील पर्यावरणप्रेमी लाखोच्या संख्येने वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळेच वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिला आल्याचा निष्कर्ष भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून नोदवला गेला आहे. महाराष्ट्रातील पहिले कांदळवन पार्क बोरिवलीत विकसित होत आहे. जंगल से जीवन के मंगल तक जाताना वनक्षेत्र हे रोजगार संधी देणारे क्षेत्र झाल्याचेही ते म्हणाले.