नागपूर - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या १५१४ सदनिकांची संगणकीय सोडत केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते आज नागपूर येथील सायंटिफिक सभागृहात काढण्यात आली.
नागपूर मंडळातर्फे पहिल्यांदाच सदनिकांची संगणकीय ऑनलाइन सोडत काढण्यात आली असून या सोडतीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. याप्रसंगी राज्य सभा सदस्य पद्मश्री डॉ . विकास महात्मे, नागपूर मंडळाचे सभापती तारिक कुरेशी तसेच नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी भिमनवार याप्रसंगी उपस्थीत होते.
दि. १८ जुलै २०१८ रोजी नागपूर मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या सदनिका सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी नागपूर येथील वांजरा, बेलतरोडी, चिखली देवस्थान, चंद्रपूर येथील नवीन, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि नागपूर येथील छाभा (एसडीपीएल ) यांचा प्रकल्प येथील एकूण १३४७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता वांजरा आणि नागपूर येथील छाभा (एसडीपीएल ) येथील एकूण ७७ सदनिकांचा समावेश आहे. तर मध्यम उत्पन्न गटाकरिता नागपूर येथील चिखली देवस्थान, आणि नवीन चंद्रपूर येथील एकूण ९० सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
या सोडत प्रक्रियेवर देखरेख व मार्गदर्शन करण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली होती यामध्ये महारेरा चे उपसचिव गिरीश जोशी. म्हाडाचे उपमुख्य अभियंता सुनील साधवानी व शासकीय तंत्र निकेटांचे सुमित खत्री यांनी या समितीवर कामकाज पहिले . या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेब कास्टिंग द्वारे म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळावर तसेच यु ट्युब वर करण्यात आले. उपस्थित विजेत्या अर्जदाराचे पुष्पगुच्छ व म्हाडाचे एक स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. सोडतीतील विजेत्या अर्जदारांना पात्रता निश्चिती करिता म्हाडाचे नागपूर येथील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन भीमनवार यांनी केले आहे.