मुंबईत टीबीच्या रुग्णांमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2018

मुंबईत टीबीच्या रुग्णांमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ


मुंबई - गेल्या पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ९८ टक्के इतकी वाढ झाली आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा टीबीच्या रुग्णांमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक टीबीचे रुग्ण एल वॉर्डमध्ये (कुर्ला) असल्याची धक्कादायक बाब प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून उघड झाली आहे.

प्रजा फाऊंडेशनने 'मुंबईकरांच्या आरोग्याची स्थिती' याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालासाठी प्रजाने हंसा रिसर्चकडून सर्वेक्षण करून माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवली. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना प्रजा फाऊंडेशनचे निताई मेहता व मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, मुंबईतील २०,०७८ घरांसाठी सर्वेक्षण करण्यात आले. यात ७६ टक्के घरांमध्ये कोणाचाही विमा उतरवण्यात आला नव्हता. डेंग्यूची अंदाजे १,२१,७७५ तर मलेरियाची १,१५,२६८ इतकी प्रकरणे आढळली. आरटीआयच्या साहाय्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१३-१४ मध्ये टीबीचे ४१,४७९ इतके रुग्ण होते, त्यात यंदा ३३ टक्के वाढ झाली असून, ही संख्या ५५,१३० वर गेली आहे. सर्वाधिक टीबीचे रुग्ण एल वॉर्डमध्ये (कुर्ला) आढळले. त्याखालोखाल एच/ईस्ट वॉर्डमध्ये (सांताक्रुझ) ६१४, तर एस वॉर्डमध्ये (भांडुप) ४६९ रुग्ण आढळले. तर गेल्या पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांत ९८ टक्के वाढ होऊन ही संख्या ७,२६१ वरून १४,३४५ वर गेली आहे. पालिका व सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून पी/एस प्रभागात २,३१,७५४ लोकांमध्ये केवळ एकच दवाखाना आहे. तर सरकारी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये मलेरिया व डेंग्यूची अनुक्रमे ११,१६३ आणि १४,३४५ रुग्ण आढळल्याचेही त्यांनी नमूद केले.

Post Bottom Ad