मुंबई - केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील ज्या दोन मुलींच्या शाळांनी पुरस्कार पटकावले, त्यांच्या मुख्याध्यापकांना उत्तम शिक्षण पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी फिनलँड देशात पाठविण्यात येणार अशी घोषणा सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.
शिक्षक दिनानिमित्त बडोले यांनी मुंबईतील प्रशासकिय इमारतीमधून व्हिडीओ कान्फरन्सद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या शाळांचे सर्व मुख्यध्यापक, शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी लातूर जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील मुलींच्या दोन शाळांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबाबत त्यांनी मुख्यध्यापक मुकूम आणि मुख्याध्यापक जमादार यांचे जोरदार अभिनंदन करून त्यांना फिनलँडच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्याची घोषणा केली.
सामाजिक न्याय विभागाच्या शाळांना आयएसओचा ( ISO) दर्जा मिळाल्याबाबतही बडोले यांनी सर्व शाळांच्या मुख्यध्यापक, शिक्षक आणि संबंथित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. साधारण तीन वर्षांपूर्वी सन 2015 मध्ये बडोले यांनी राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्वच शाळांची कार्यशाळा घेऊन इतर नामांकित शाळांप्रमाणे आपल्या विभागाच्या शाळांचा दर्जा, शैक्षणिक, गुणवत्ता, व्यक्तीमत्व विकास आदी सामाजिक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याच्या सूचना दिल्या होत्य. आज 8 शाळांच्या दर्जात लक्षणिय सुधारणा झालेली असून निवासी शाळांना (ISO) आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्यामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या दोन शाळांना केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकासमंत्रालयाने स्वच्छ शाळांचा राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे, यात संबंधित शाळांच्या मुख्यध्यापकांचा तसेच विद्यार्थींनीचा सिंहाचा वाटा आहे. शासकिय शाळा कशी असावी याचा उत्तम नमुना त्यांनी उभारला आहे. निसर्गाशी समरस होतांनाच, पाणी बचत, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे योग्य नियोजनासोबतच वैयक्तीक स्वच्छतेसाठी आदर्श आचारसंहिता त्यांनी अंगिकारल्यामुळेच त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होत आहे. भावी काळात सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाधिक शाळांनी याचा आदर्श घेत त्यांचे अनुकरण केल्यास पुढील वर्षी अधिक शाळांना केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो, असेही बडोले यांनी व्हिडीओ कान्फरन्सद्वारे सर्व शाळांना आवाहन केले.