मुंबई - परळ येथील केईएम रुग्णालयात महापालिकेतर्फे 'रोबोटिक सर्जरी'चा विभाग सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी 'रोबोटिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र' महापालिकेने सुरू करावे, अशी सूचना पालिका प्रशासनाला केली होती.
भारताबाहेरील देशांमध्ये सध्या रोबोटिक सर्जरीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रोबोटिक सर्जरीच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांना दिल्यास त्याचा लाभ पालिका रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांनाही होईल. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचे हात जिथे पोहोचत नाहीत, तेथे रोबोटिक सर्जरीचा उपयोग होतो. यासाठी रोबोटिक सर्जिकल ट्रेनिंग इ्स्टिटट्यूट महापालिकेने सुरूकरावी, जेणेकरून पालिकेतील डॉक्टरांबरोबरच डॉक्टरांनाही तेथे हे प्रशिक्षण उपलब्ध होईल, अशी सूचना डॉ. खान यांनी प्रशासनाला केली होती.
महापालिकेच्या आयुक्तांनी यावर सकारात्मक पावले उचलून, याविषयी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तज्ज्ञांचे अभिप्राय घेण्यात आले. यावर वरिष्ठ पातळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालिकेच्या केईएम रुग्णालयात रोबोटिक सर्जरीचा विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यासंबंधी सूचना दिली आहेत तसेच वडाळा येथील सीटी सर्व्हे क्र. ९/१६ या भूखंडावर महापालिकेचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये 'सिम्युलेटींग लॅब'सह रोबोटिक सर्जरीचा विभाग सुरू करण्याचे योजिले आहे, अशी माहिती आयुक्तांनी अभिप्रायात दिली आहे.