बोगस कॉल सेंटर मालकासह दोघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2018

बोगस कॉल सेंटर मालकासह दोघांना अटक


मुंबई - दीड हजार अमेरिकन नागरिकांना तब्बल दीड कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटर मालकासह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट ९ च्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सतत १५ तास तपास करून हे रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणातील फरारी असलेल्या चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

अंधेरी (प.), एस. व्ही. रोड, सबवेसमोरील ५८ वेस्ट बिल्डिंग, दुसऱ्या माळ्यावर असलेल्या एक्सफिनिटी कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष - ९ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद धराडे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या माार्गदर्शनाखाली ६ सप्टेंबर रोजी रात्री कॉल सेंटरवर पोलीस पथकाने धाड टाकली. त्या वेळी ३९ जण कॉम्प्युटरवर काम करत होते. पोलिसांनी संगणक तज्ज्ञ कुलदीप इंदरकर, पुष्कर झांट्ये यांच्या मदतीने कॉम्प्युटरमधील डाटा तपासला असता, अमेरिकन नागरिकांची संपूर्ण माहिती, व्हीआयपी कॉल, ई-मेल आढळून आले. या माहितीच्या आधारे कॉल सेंटरमधून अमेरिकन ॲक्सेंटनुसार संवाद साधून कॉम्प्युटरमधील व्हायरस, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॉम्प्युटरची दुरुस्ती, मालवेअर क्लिन करून देण्याच्या मोबदल्यात पैसे घेण्याचे येत होते. त्या मोबदल्यात गिफ्ट कार्डच्या माध्यमातून अमेरिकन डॉलर स्वीकारले जात होते. हे डॉलर भारतीय वेंडरकडून भारतीय चलनात रुपांतरी केली जायची. मात्र, पैसे घेतल्यानंतर अमेरिकन नागरिकांची कॉम्प्युटरच्या संदर्भात असलेली दुरुस्ती केली जात नव्हती. या फसवणुकीच्या फंड्यानुसार गेल्या ७ महिन्यांत कॉल सेंटरच्या माध्यमातून दीड हजार अमेरिकन नागरिकांची दीड कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करून एक्सफिनिटी कॉल सेंटरचा मालक डेव्हिड अल्फान्सो (२२) व संदीप यादव (२२) यांना अटक केली. या फसवणूक प्रकरणात आणखी ४ ते ५ जणांचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्या दृष्टिकोनातून गुन्हे शाखा कक्ष ९ चे पथक तपास करत आहेत. गुुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट -९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशा कोरके, सपोनि. इरफान शेख, सपोनि. शरद धराडे, पोउनि. वाल्मिक कोरे, पोउनि. विजयेंद्र आंबवडे, हवालदार शिर्के, शिंदे, गावकर, सावंत, पाटील, शेख, वारंगे, पेडणेकर, नाईक, हाके, राऊत, पोशि महांगडे, पवार, निकम आदी पोलीस पथकाने संगणक तज्ज्ञ कुलदीप इंदरकर, पुष्कर झांट्ये यांच्या मदतीने या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Post Bottom Ad