मुंबई - शारीरिक श्रम टाळण्याकडे बहुतांश जणांचा कल असण्यासाठी व्यक्तीचा मेंदू कारणीभूत असल्याची बाब एका ताज्या संशोधनातून समोर आली आहे. श्रम टाळण्याच्या दृष्टीने मेंदूची नैसर्गिक रचना झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती कामात आळस दाखवत असेल तर यासाठी त्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी त्याच्या मेंदूलाच यासाठी जबाबदार धरले जावे, अशी मिश्किल टिप्पणी केली जात आहे.
शरीरातील ऊर्जा राखून ठेवण्याकडे मेंदूकडून नैसर्गिकरीत्या अधिक भर दिला जातो. या दृष्टीनेच मेंदूची अंतर्गत रचना झालेली असते आणि त्या दृष्टीनेच मेंदू कार्य करीत असतो. त्यामुळे अनावश्यक शारीरिक श्रम टाळून शरीराची ऊर्जा कायम ठेवण्यासाठी मेंदूकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. म्हणूनच अनेक जण प्रबळ इच्छा असूनही व्यायाम करणे टाळतात, असे कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधक मॅथ्यू बोईसगॉन्टीएर म्हणाले. यासाठी संशोधकांनी काही तरुणांचे संगणकीय अवतार तयार करून त्यांना या अवताराच्या स्क्रीनसमोर उभे केले. यावेळी या अवतारांच्या आजूबाजूला शारीरिक श्रम असलेली व शारीरिक श्रम नसलेली काही छोटी छायाचित्रे टाकली. तसेच या तरुणांच्या मेंदूच्या हालचाली टिपण्यासाठी विशिष्ट यंत्र त्यांच्या शरीराला जोडले. यानंतर हे अवतार संबंधित व्यक्तीच्या इच्छेनुसार शारीरिक श्रम असलेल्या छायाचित्राकडे धावू लागल्यानंतर त्या व्यक्तीच्या मेंदूला अधिक कष्ट करावे लागत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. तर शारीरिक श्रम नसलेल्या छायाचित्राकडे धावताना मेंदूला जास्त कष्ट करावे लागत नसल्याचे त्यांना दिसून आले. यावरून मेंदूचा कल हा श्रम टाळण्याकडेच असल्याचे संशोधकांना दिसून आले. म्हणून एखादा व्यक्ती जर कष्ट टाळून आराम करण्याला प्राधान्य देत असेल तर यात त्याचा काहीच दोष नसतो, अशी मिश्किल टिप्पणी यावर केली जात आहे. विज्ञानविषयक नियतकालिकात हे संशोधन विस्तृतपणे प्रकाशित झाले आहे.