मुंबई - मुंबईत आजारपणावरील खर्च आवाक्याबाहेर असल्याने नागरिक धर्मादाय किंवा पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे पालिकेच्या सायन केईम आणि नायर रुग्णालयावर मोठा ताण पडतो. हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने उपनगरीय रुग्णालयांना 'मल्टिस्पेशालिटी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
मुंबईतील साधारणत: ६० टक्के जनता पश्चिम आणि पूर्व उपनगरात राहते. वैद्यकीय सुविधेसाठी या लोकांना पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचाच आधार आहे. पण, एखादी मोठी चाचणी किंवा अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना मुंबईतील केईएम, नायर आणि सायन रुग्णालय गाठावे लागते. त्यामुळे लाखो रुग्णांचा भार या रुग्णालयांवर पडतो. हा भार कमी करण्यासाठी आणि रुग्णांची वणवण थांबवण्यासाठी उपनगरीय रुग्णालयांना 'मल्टिस्पेशालिटी' बनवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यात उपनगरातील चार प्रमुख रुग्णालयांचा विस्तार आणि अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबत या रुग्णालयात विशेष सेवा पुरवण्यात येतील. अन्य उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने या रुग्णालयांना जोडण्यात येतील. यामुळे उपनगरातील रुग्णांना हृदयविकार, मेंदू शस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकारासह प्रमुख आजारांसाठी उपनगरातच अत्याधुनिक उपचार मिळणे आता शक्य होणार आहे. याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुलुंडचे एम. टी. अग्रवाल रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, विक्रोळीतील महात्मा जोतिबा फुले रुग्णालय, अग्रवाल रुग्णालय आणि बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाचे काम दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपनगरीय रुग्णालयांत अत्याधुनिक सुविधाही पुरवण्यात येणार आहे. जनरल रुग्णालयात ३०० अतिरिक्त खाटा, तर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांसाठी १५० खाटांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णांसाठी नाश्ता आणि जेवणाचीही सोय या रुग्णालयात उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करणार आहे.
२७४ पदे भरणार -
उपनगरीय रुग्णालयांत विशेष सुविधा पुरवताना रुग्णांवर दर्जेदार उपचार व्हावेत याकरता वैद्यकीय अधिकाऱ्यांची २७४ पदे भरण्यात येणार आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांचीही नियुक्ती केली जाणार आहे. उपनगरीय रुग्णालयांत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने रुग्णांना मुंबईतल्या रुग्णालयांत धाव घ्यावी लागणार नसून त्यांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.