मुंबई - महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करून दादरच्या हॉकर्स प्लाझात रातोरात ५ गाळ्यांचे बेकायदेशीर बांधकाम केले असून, त्यांना मदत करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी केली. या प्रकरणावरून सदस्यांनी बाजार खात्यातील अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही सूचना केली.
हॉकर्स प्लाझासंबंधीचा दावा न्यायालयात सुरू असल्याने न्या. ओक आणि न्या. छागला यांनी महापालिकेला याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले असताना आणि तेथील १०० ते १५० गाळे रिकामे असूनही बाजार खात्यातील अधिकाऱ्यांनी रातोरात ५ अनधिकृत गाळे बांधण्याची अनुमती कायद्याचे उल्लंघन आणि स्थायी समितीला अंधारात ठेवून करून दिली. पालिकेच्या इमारत प्रस्ताव, वास्तूविशारद आदी खात्यांची परवानगी घेऊन हे गाळे बांधले आहेत का, हे गाळे बांधण्याचे कारण काय, हे बांधकाम करण्याची परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिली, अशी विचारणा भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी समितीमध्ये हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.
'मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि मी महापौर असताना सन २००० मध्ये हॉकर्स प्लाझासंबंधी १५० हून अधिक बैठका झाल्या होत्या, अशी आठवण राऊत यांनी सांगून स्थायी समितीला अंधारात ठेवून मोकळ्या जागेत ५ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. हे गाळे बांधण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्न सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला. हे बांधकाम करण्यासाठी परवानगी देणारा मुकादम किंवा छोटा अधिकारी नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे सर्व महापालिकेने परत घेण्याची मागणी राऊत यांनी केली.
पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नामनिर्देशित अधिकाऱ्यांची (डीओ) नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांनी गेल्या दीड वर्षांत किती बांधकामांना नोटिसा दिल्या आणि किती तोडली याची आकडेवारी समितीला सादर करण्याची मागणी सामंत यांनी केली. हॉकर्स प्लाझासंबंधीचा मुद्दा अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याबद्दल समितीला माहिती सादर करावी, असे निर्देश समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले व हरकतीच्या मुद्द्यावरील निर्णय राखून ठेवला.