नागपूर - सातत्याने होणाऱ्या रुपयाच्या अवमूल्यनासाठी शासनाची धोरणे कारणीभूत आहेत. मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबांनी भाजपाची साथ सोडणे आवश्यक आहे. आधी राष्ट्र वाचवा मग धर्माचा विचार करू. त्यामुळे भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला जाईल, अशी भीती भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी नागपुरात व्यक्त केली.
आंबेडकर म्हणाले की, वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार गेल्या ३ ते ४ वर्षांत भारतातील ७५ हजार गर्भश्रीमंतांनी देश सोडला आहे. यामध्ये १० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती असलेल्या लोकांचा समावेश आहे. केंद्र सरकारने इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि यासारख्या इतर संस्थांच्या माध्यमातून चालविलेल्या कारवाईमुळे या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे धनाढ्य लोक देश सोडून कायमस्वरूपी स्थलांतर करत आहेत. विशेष म्हणजे, देश सोडताना या लोकांनी त्यांच्याजवळील चल-अचल संपत्ती विकून आलेला पैसा डॉलर्समध्ये परिवर्तीत केला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडे असलेली परदेशी चलनाची गंगाजळी संपली आहे. गेल्या काही वर्षांत स्थलांतर करणाऱ्यांनी १९ बिलियन डॉलर्सची गंगाजळी आपल्या सोबत नेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होण्यास प्रारंभ झाला आहे. हे असेच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसात एक डॉलर ७५ रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. यापूर्वी १९९० साली देशापुढे अशीच दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण झाली होती, असेही ते म्हणाले.