वॉशिंग्टन - अमेरिकेतील प्रसारमाध्यमांवर सातत्याने टीका करणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना लक्ष्य केले आहे. ‘ट्रम्पविरोधी भूमिकेच्या अतिरेकामुळे शहाणपण गमावलेली प्रसारमाध्यमे आमच्या सरकारच्या कामकाजाची अंतर्गत माहिती उघड करत आहेत. त्यामुळे केवळ पत्रकारच नव्हे, तर अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. हे देशभक्तीचे लक्षण नाही,’ असा हल्लाबोल ट्रम्प यांनी ट्विटरवर केला आहे.
मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर चुकीच्या वार्तांकनाचा आरोप करताना, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासोबत अचूक वार्तांकनाची जबाबदारी पाळणे बंधनकारक आहे, असे ट्रम्प म्हणाले. ‘अत्यंत सकारात्मक कामगिरी असतानाही, माझ्या प्रशासनाचे ९० टक्के वार्तांकन हे नकारात्मक आहे. त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता सद्यस्थितीत सर्वाधिक खालावली आहे, यात आश्चर्य नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘मरणपंथाला लागलेल्या वृत्तपत्र उद्योगातील ट्रम्पद्वेष्ट्यांना हा महान देश विकता येणार नाही. त्यांनी लक्ष विचलित करण्याचा किंवा वास्तव झाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी माझ्या नेतृत्वाखाली देश उत्तम प्रगती करत आहे,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.