जकार्ता - इंडोनेशियात लोम्बोक बेटावर पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या धक्क्यांची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातल्या जमिनीच्या १०.५ किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. भूकंपामुळे ८२ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या भूकंपाचे हादरे बाली द्वीपसमूहापर्यंत जाणवले होते.
भूकंपामुळं कोसळलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं असल्याचं असं इंडोनेशिया आपत्ती निवारण यंत्रणेचे प्रवक्ते सुतोपो पूर नोग्रोहो यांनी सांगितलं. यामुळं भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सर्व नागरिक भीतीनं घराबाहेर आले आणि अनेक जणांचा मृत्यू झाला असं लॉम्बॉक आपत्कालीन विभागाचे अधिकारी इवान अस्मारा म्हणाले.
एक आठवड्यापूर्वी लोम्बोक बेटावर ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. यात १७ जण ठार झाले होते. आता पुन्हा या परिसरात हादरे जाणवले आहेत. यापूर्वी २००४ मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर ९.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. परिणामी नंतर आलेल्या त्सुनामीमुळे भारतासह अनेक देशांमध्ये २ लाख २० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. इंडोनेशियातच यापैकी १ लाख ६८ हजार बळी गेले होते.
त्सुनामीचा धोका टळला -
या भूकंपानंतर इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर लोकांना समुद्री भागापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हवामान विभागानेही नागरिकांना उंच ठिकाणी आसरा घेण्याची सूचना केली होती. परंतु त्सुनामीचा धोका टळला असल्याचं तेथील हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.