मुंबई - काळाचौकी, शिवडीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासन ३.६१ कोटी रुपये खर्चून उदंचन केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
पालिकेच्या एफ/दक्षिण विभागाच्या हद्दीतील कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाजवळील बीपीटी बाऊंड्री रोड येथे जल अभियंता खात्याचे ४.५ दशलक्ष क्षमतेचे फॉसबेरी सेवा जलाशय व उदंचन केंद्र आहे. हे जलाशय आणि उदंचन केंद्र १९८९ पासून कार्यान्वित आहे. या केंद्रातून आंबेवाडी काळाचौकी विभागाला सकाळी ४ ते ७ आणि बीपीटी शिवडी विभागाला संध्याकाळी ६ ते ८.४० या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. या विभागात पाण्याची कमतरता व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
फॉसबेरी सेवा जलाशय व उदंचन केंद्रात २७८ लिटर प्रतिसेकंद व ४४ मीटर दाब क्षमतेचे तीन उदंचक संच कार्यान्वित आहे. हे उदंचक संच मागील २७ वर्षे सातत्याने वापरात असल्याने त्यांच्या मोटर्स व विद्युत क्युबिकल कंट्रोल पॅनलची क्षमता व आयुष्यमान संपले आहे. त्याचे सुटे भागही लवकर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आता या विभागात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जुने उदंचक संच बदलून ३०० लिटर प्रतिसेकंद व ५० मीटर दाब क्षमतेचे उदंचक संच बसवण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. त्यासाठी मे. हायटेक इंजिनीअर्स या कंत्राटदाराला ३.६१ कोटीचे कंत्राट देण्यात येणार आहे.