लंडन - बिहारमधील नालंदा येथील एका संग्रहालयातून १२ व्या शतकातील कांस्य धातूची बुद्ध मूर्ती सुमारे ६० वर्षांपूर्वी चोरली गेली होती. ती मूर्ती लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनी भारतीय सरकारकडे सुपूर्द केली. कायद्याची योग्य ती अंमलबजावणी, व्यापार आणि विद्वान यांच्यातील घनिष्ठ सहकार्यामुळे ही मूर्ती भारताला परत करणे सहज शक्य झाल्याचे मत मेट पोलीसचे पोलीस निरीक्षक शीला स्टुअर्ट यांनी व्यक्त केले.
१९६१ मध्ये नालंदा येथील भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (एएसआय) साइट संग्रहालयातून १४ पुतळे चोरण्यात आले होते. लंडन येथील एका लिलावामध्ये या १४ पुतळ्यांपैकी एका कांस्यच्या मूर्तीचा हात बदलण्यात आला होता. डीलर आणि मालक यांना शिल्पकलेची जाणीव असल्यामुळे भारतातून चोरीस गेलेल्या याच मूर्ती असल्याची त्यांची खात्री झाली आणि त्यांनी त्यांची माहिती मेट्रोपॉलिटन पोलिसांना दिली. त्यांनी मेट आर्ट अँड ॲण्टी चीज युनिटला मदत केली आणि भारत सरकारला ती मूर्ती परत करण्यासाठी सहकार्य केल्याची माहिती लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिली. याचवर्षी मार्च महिन्यामध्ये झालेल्या एका ट्रेड शोमध्ये असोसिएशन फॉर रीसर्च इन क्राइम्स अगेन्स्ट आर्टचे (एआरसीए) लिंडा अल्बर्टसन यांनी मूर्ती ओळखली, तर द इंडियन प्राइड प्रोजेक्टचे विजयकुमार यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत स्कॉटलंड यार्ड यांनी पुतळे भारतीय हाय कमिशनर वाय. के. सिन्हा यांच्याकडे सुपूर्द केले..