शिमला - पोलीस दलातील लाचखोरीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या उनामधील पोलीस दलाने एक नामी शक्कल लढविली आहे. कर्तव्य बजावत असताना सोबत २०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगायची नाही, असे कडक निर्देश येथे पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. यापेक्षा जास्त रक्कम जवळ सापडल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
चिंतपूर्णी, ज्वालाजी व कांग्रासह इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून चौकीवर तैनात असलेले पोलीस लाच घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने मिळत असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकारांना लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही नामी शक्कल लढविली आहे. विशेषत: पंजाबमधून येणाऱ्या भाविकांकडून हे पोलीस लाच घेत असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्याचे पोलीस अधीक्षक दिवाकर शर्मा यांनी सांगितले. नव्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना सोबत २०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगता येणार नाही. जर आपत्कालीन परिस्थितीत कुणाला यापेक्षा जास्त रक्कम सोबत ठेवायची असेल तर त्यांना याची स्टेशन डायरीत कारणासह नोंद करणे गरजेचे असल्याचे शर्मा म्हणाले. या नियमामुळे लाचखोरीच्या प्रकाराला आळा बसेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. लाचखोरीच्या तक्रारीनंतर केलेल्या कारवाईदरम्यान आतापर्यंत एकूण पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही शर्मा यांनी सांगितले.