मुंबई - गुजरातमधील गरीब मुलांना ४५ लाख रुपयांत अमेरिकेत विकणाऱ्या रॅकेटमधील मुख्य आरोपीला वर्सोवा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. राजूभाई गमलेवाला असे अटक आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत ३०० मुलांची मानवतस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे..
११ ते १६ वयोगटातील मुलांची तस्करी करण्याचे हे रॅकेट २००७ पासून राजूभाई हा आपल्या साथीदारांसह चालवत आहे. गुजरातमधील गरीब कुटुंबाला हेरून त्यांची मुले विकत घ्यायची व दुसऱ्याच्या पासपोर्टचा वापर करून त्या मुलांचा चेहरा पासपोर्टवर असलेल्या मुलाशी जुळवण्यासाठी त्यांना मेकअप करण्यात येत असे. अशाच प्रकारे गेल्या मार्चमध्ये वर्सोवा येथील एका सलूनमध्ये गुजरातहून आणलेल्या दोन मुलांचा मेकअप करण्यात येत होता. त्या वेळी त्या सलूनमध्ये गेलेल्या प्रीती सूद हिला त्या मुलांबाबत संशय आला. प्रीतीने याबाबतची माहिती तत्काळ वर्सोवा पोलिसांना दिली. वर्सोवा पोलिसांनी तत्काळ सलूनमध्ये धाव घेत त्या मुलांना ताब्यात घेतले. त्या वेळी या मानव तस्करीचा उलगडा झाला. त्या वेळी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा अमीर खान (२६), तेजुद्दीन खान (४८), अफजल शेख (३५) आणि रिझवान छोटाणी (३९) या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. राजूभाई त्याच्या साथीदारांशी व्हॉट्सॲपवरून संपर्क साधत असे. त्यावरूनच शोध लावून त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने राजूभाई याला १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस या रॅकेटचा अधिक तपास करीत आहेत.