मुंबई- गोवंडीतल्या संजयनगर येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील २३९ विद्यार्थाना औषधाचे रिऍक्शन झाली. यात चांदणी शेख (१२) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेत देण्यात आलेल्या लोह आणि फॉलिक असिडच्या औषधाने झाल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी गोवंडी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरले. त्यामुळे पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांवर राजावाडी व शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोवंडीतील संजयनगर परिसरात असलेल्या महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. राज्य शासनाच्या उपक्रमानुसार शालेय विद्यार्थ्यांना दर सोमवारी फॉलिक अॅसिड या गोळ्या दिल्या जातात. गरीब कुटुंबातील असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी या गोळ्या देण्यात येतात. संजय नगरमधील उर्दू शाळेच्या काही मुलांना शुक्रवारी मळमळू लागले. काहींची प्रकृती अधिक बिघडून त्यांना उलट्या होऊ लागल्या. यामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. या गोळ्यांमुळेच रिअॅक्शन होऊन मुलांची प्रकृती बिघडली असा आरोप पालकांकडून होत आहे.
चांदनी साहिल शेख (वय १२) या विद्यार्थिनीने ६ ऑगस्ट रोजी या गोळ्या घेतल्या होत्या. तीला रक्ताची उलटी झाली. रुग्णालयांत उपचार सुरु होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मात्र चांदनीच्या बहिणीनेही सोमवारी या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर या मुली दोन दिवस शाळेतही आल्या. मृत विद्यार्थिनीची प्रकृती याआधीच बिघडलेली होती, असे कारणही पुढे येत आहे. या घटनेची चौकशी सुरु करण्यात येणार असून वैद्यकीय अहवालानंतरच हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे स्पष्ट होणार आहे. या मुलांना त्रास झाल्याचे कळताच पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे, आरोग्य समितीच्या अध्यक्ष अर्चना भालेराव, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर आणि अन्य आरोग्यअधिकाऱ्यांनीही रुग्णालयाकडे धाव घेतली. दुपारी तीन वाजेपर्यंत हा परिसर गर्दीने भरून गेला होता.
गोळ्यांशी संबंध आहे का? वैद्यकीय अहवालानंतर कळेल - पालिकेतर्फे गरीब मुलांना प्रोटिन युक्त गोळ्या देण्यात येतात. गोवंडी येथील महापालिकच्या शाळेत विषबाधा झाली असा समज होऊन गोंधळ उडाला आहे. सोमवारी विद्यार्थ्यांना प्रोटिनयुक्त गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या खाऊन एक मुलगी दगावली. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. राजावाडी मध्ये ११ तर १४० मुलांना शताब्दी रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे. गोळ्यांशी याचा संबंध आहे का? हे वैद्यकीय अहवालानंतरच कळेल.
– विश्वनाथ महाडेश्वर, महापौर
गोळ्यांचा परिणाम होत नाही. - फॉलिक असिडच्या गोळ्या दिल्या होत्या. त्या दर आठवड्याला दिल्या जातात. त्यामुळे कोणताही परिणाम होत नाही. वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल.
– अर्चना भालेराव, आरोग्य समिती अध्यक्ष