मुंबई - सतत टीव्ही पाहत असल्यामुळे वडील रागावल्याने पुण्याहून मुंबईला एका अल्पवयीन मुलीने पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. दैव बलवत्तर म्हणून महिला पोलिसाची या मुलीवर नजर पडली. अखेर कुलाबा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मुलीचा ताबा आईवडिलांकडे देण्यात आला असून ती सुखरूप आहे..
मुलांना पालकांनी काही बोलण्याची सोय राहिली नसून हल्लीची मुले रागाच्या भरात नको ती पावले उचलतात व त्याचा मनस्ताप पालकांना भोगावा लागतो, अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशाच प्रकारे पुणे, देहू रोड येथे राहणारी ७ वर्षीय मुलगी घरात असताना सतत टीव्ही बघत बसायची. त्यावरून वडिलांनी १५ ऑगस्टच्या दिवशी मुलीस झापले. या कारणावरून अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता बाहेर पडली आणि रागाच्या भरात तिने मुंबई गाठली. गेटवे ऑफ इंडिया येथे रात्री १० च्या सुमारास मुलगी एकटीच बसली होती. त्या वेळी गस्तीवर असलेल्या कुलाबा पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅन नं. ५ च्या महिला पोलीस नाईक जिजाबाई पवार यांनी तिची चौकशी केली. मात्र ती काहीच बोलत नसल्याने पवार यांनी तिला कुलाबा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिची विचारपूस केली, मात्र त्या मुलीने स्वत:बद्दल काहीएक सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी ड्युटीवर आलेल्या महिला पोलीस शिपाई संगीता वासावे यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने वडिलांचा मोबाईल नंबर दिला. पवार यांनी त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून मुलगी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात सुखरूप असल्याची माहिती पालकांना दिली. या माहितीवरून मुलीचे पालक पोलीस ठाण्यात दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.