मुंबई - घाटकोपर येथील हिमालय सोसायटी परिसरात गेल्या काही दिवसापासून अनधिकृत पार्किंग, अनधिकृत बांधकामे होत आहेत. यामुळे या विभागात वाहतूक कोंडी होत असल्याने बेस्टची बससेवा बंद करण्यात आली आहे. याकारणाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोर्चा काढला.
घाटकोपरमधील हिमालय सोसायटी हा अतिशय मोठी रहिवासी वस्ती असलेला विभाग आहे. परंतु या सोसायटीलाा जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात. भंगार झालेल्या गाड्या उभ्या आहेत, तसेच अनेक बांधकामे ही रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेली आहेत. यामुळे या विभागात मोठी वाहतूक कोंडी होते. या विभागात येणारी बेस्टची बस सेवाही यामुळे बंद केली गेली आहे. तर इथे येणाऱ्या शाळेच्या बस देखील इथे पोहोचू शकत नाहीत. यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच या विभागात नशेखोरी वाढली आहे. त्यामुळे चोऱ्या, लूटमार आणि छेडछाडीच्या प्रकाराने महिला त्रस्त झाल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कारवाई करीत नसल्याने अखेर नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी या विभागात मोर्चा काढला. त्यानंतर आज दिवसभर हे नागरिक उपोषणाला बसले होते. यात सर्वच राजकीय पक्षांनी देखील सहभाग घेतला होता.