जामखेड - एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापले अस्ताना धनगर आरक्षणप्रश्नी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी (१३ ऑॅगस्ट रोजी) राज्यभर तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय धनगर समाज महासंघातर्फे घेण्यात आला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आठ सप्टेंबर रोजी चौंडीत महामेळाव्यात सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार आहे.
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी तालुक्यातील चौंडी येथील मानकोजी शिंदे स्मृती सभागृहात धनगर समाज महासंघातर्फे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. धनगर समाज आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक व धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रामहरी रूपनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस माजी मंत्री अण्णा डांगे, अहल्या आघाडीच्या अलका गोडे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती करडे, सुनील वाघ, चौंडीचे सरपंच अभिमन्यु सोनवणे, अविनाश शिंदे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर आरक्षण प्रश्री १३ ऑॅगस्ट पासून करण्यात येणारी आंदोलने लोकशाही मार्गाने करण्याचे आवाहन माजी मंत्री अण्णा डांगे यांनी केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सध्याचे भाजपचे सरकार वेळकाढूपणा करीत असून, गेली चार वर्ष केवळ अभ्यास चालू असल्याचे सांगून प्रत्यक्ष आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास मात्र टाळाटाळ करीत आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी धनगर आरक्षणप्रश्नी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनात सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकित आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्ष काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजप सरकारने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर राज्यातील धनगर समाज भाजपाच्या बरोबर राहिला. मात्र, आरक्षण प्रश्री धनगर समाजाची घोर फसवणूक झाली आहे.