मुंबई - मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. या ऑडीटचा अहवाल नुकताच विभाग कार्यालयांना सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबईत ३८३ शौचालये धोकादायक असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत ५ मार्च २०१५ रोजी मानखुर्द महाराष्ट्रनगर साईबाबा चाळ येथे शौचालय धसल्याने एकाचा मृत्यू झाला होता. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी मानखुर्द मंडालातील इंदिरानगर लोहारचाळ येथील शौचालय कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला होता. २८ एप्रिल २०१८ रोजी भांडुप टँक रोड येथे शौचालयाची टाकी फुटल्याने २ जणांचा मृत्यू झाला होता. शौचालयाच्या या दुर्घटनांमुळे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जानेवारी महिन्यात सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयांचे ऑडिट करण्यात येत आहे.
मुंबईत १४१५ सार्वजनिक शौचालये असून त्यातील आतापर्यंत ९३४ शौचालयांचे ऑडिट करण्यात आले आहे. तर, त्यातील ३५५ शौचालयांचे ऑडिट होणे बाकी आहे; परंतु ऑडिट करण्यात आलेल्या ९३४ शौचालयांपैकी एम पश्चिम विभागात १५८, एन विभागात ७०, एस विभागात ४९, डी विभागात २६ अशी एकूण ३८३ शौचालये धोकादायक स्थितीत असल्याची आढळून आली आहेत. ही सर्व ३८३ शौचालये सी वन प्रवर्गात मोडत असल्यामुळे ती तोडून पुन्हा त्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर, १८ सार्वजनिक शौचालयांची मोठय़ा स्वरूपात दुरुस्ती केली जाणार आहे आणि १०२ शौचालयांची किरकोळ स्वरूपात दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे. या सर्व कामांना ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त (घनकचरा) विश्वास शंकरवार यांनी दिली.
महापालिकेच्या बी आणि सी विभागांमध्ये एकही सार्वजनिक शौचालयांची बांधणी करण्यात आलेली नाही. तर, जी-दक्षिण विभागात ६० सार्वजनिक शौचालये असली तरी ती म्हाडाच्या माध्यमातून बांधली गेलेली आहेत. ती महापालिकेच्या वतीने बांधली नसल्याने त्यांचे ऑडिट करण्यात आलेले नाही
- विश्वास शंकरवार, उपायुक्त - घन कचरा व्यवस्थापन