मुंबई - मुंबईसह, नवी मुंबई आणि पुणे शहरातील विकास प्रकल्पांसाठी सुमोटोमी सारख्या जपानी कंपन्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानमधील सुमीटोमी उद्योग समूहाशी निगडित रिअॅलिटी अॅण्ड डेव्हलपमेंट कंपनी, सुमीटोमी केमिकल या कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची आज येथे वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
सुमीटोमी हा जपानमधील प्रख्यात उद्योग समूह आहे. या समूहाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोजून निशिमा, उपाध्यक्ष मसाटो कोबायशी, संचालक हिसतोसी काटायाम, ताजी इन्दो, हिरोकी नाकाशिमा, रिकू तनाका यांच्यासह भारतातील सहयोगी कंपनी ब्लॅकरोज केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनूप जतिया, आदर्श जतिया यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, माहिती तंत्रज्ज्ञान विभागाचे सचिव एस.व्ही. आर. श्रीनिवास, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईसह, नवी मुंबई आणि पुणे या शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मुंबईच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या विकासात अनेक व्यावसायिक प्रकल्पही आकारास येणार आहेत. शिवाय गृह बांधणीसाठी आणि त्यातून परवडणारी घरे विकासासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. नवी मुंबई आणि पुण्यातील विमानतळ विकासाच्या प्रकल्पातही व्यावसायिक सहयोगींची आवश्यकता आहे.
यावेळी सुमीटोमी कंपनीचे अध्यक्ष निशिमा यांनी मुंबई ही वेगाने विकसित होत आहे. मुंबई आशियातील आर्थिक केंद्र (फायनान्शियल हब) म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे या विकासात सुमीटोमीलाही अनेक संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.